अमरावतीत अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांचा एल्गार; यशोदा नगर चौकात रास्ता रोको
अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील फ्रेजरपूरा परिसरात कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू व गांजा विक्रीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक सचिन वैद्य यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी यशोदा नगर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. य
अमरावतीत अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांचा एल्गार; यशोदा नगर चौकात रास्ता रोको


अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील फ्रेजरपूरा परिसरात कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू व गांजा विक्रीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक सचिन वैद्य यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी यशोदा नगर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

फ्रेजरपूरा परिसरातील विविध भागांत गावठी दारू, देशी दारू तसेच गांजाची कथितपणे सर्रास विक्री सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अवैध व्यवसायांमुळे परिसरातील नागरिक, महिला आणि तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक यशोदा नगर चौकात एकत्र आले आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. अवैध दारू व गांजा विक्रीवर तातडीने आळा घालावा, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अवैध व्यवसायांविरोधात प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande