लातूर ते परळी शिवकावड यात्रा; ५०० भाविकांचा सहभाग
बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लातूर ते परळी अशी भव्य शिवकावड यात्रा वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. लातूर शहरातील मोतीनगर भागातील ललितकुमार बालकिशन शर्मा परिवाराच्या वतीने या श
कावड यात्रा


बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लातूर ते परळी अशी भव्य शिवकावड यात्रा वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. लातूर शहरातील मोतीनगर भागातील ललितकुमार बालकिशन शर्मा परिवाराच्या वतीने या शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५०० भाविकांचा सहभाग असलेल्या या कावड यात्रेचे परळीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताका आणि ‘हर हर महादेव’, ‘जय भोले’, ‘वैद्यनाथ भगवान की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परळी शहर आणि पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे या यात्रेला पारंपरिक धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.

यंदाच्या शिवकावड यात्रेला विशेष भावनिक पार्श्वभूमी लाभली आहे. लातूरच्या मोतीनगर भागातील कै. बालकिशन शर्मा यांनी सुमारे २९ वर्षांपूर्वी मोजके मित्र आणि नातेवाईक यांना सोबत घेऊन लातूर ते परळी शिवकावड पदयात्रेची सुरुवात केली होती.

दरवर्षी ही यात्रा काढताना परिसरातील नागरिक आणि नातेवाईकही त्यात सहभागी होत गेले. त्यामुळे कालांतराने यात्रेतील भाविकांची संख्या वाढत गेली आणि या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

काही महिन्यांपूर्वी बालकिशन शर्मा यांचे वयाच्या ७५व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाचा मुख्य आधार गमावल्याचे दुःख असतानाही त्यांच्या चारही मुलांनी वडिलांची धार्मिक परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवकावड पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तयारी सुरू केली. वडिलांनी सुरू केलेली श्रद्धेची परंपरा पुढे नेण्यासाठी कुटुंबीयांनी यंदाची यात्रा आयोजित केली.

“वडिलांच्या निधनानंतरही त्यांची श्रद्धा आणि परंपरा पुढे नेत आम्ही यंदाची शिवकावड यात्रा काढत आहोत. ही यात्रा आमच्यासाठी केवळ धार्मिक यात्रा नसून वडिलांच्या स्मृतींना वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी भावना ललितकुमार बालकिशन शर्मा आणि विजयकुमार शर्मा (व्यापारी, लातूर) यांनी व्यक्त केली.

वडिलांनी सुरू केलेली २९ वर्षांची परंपरा पुढे नेण्यासाठी कुटुंबीयांसह शेकडो भाविक सहभागी झाल्याने यंदाची शिवकावड यात्रा श्रद्धा, परंपरा आणि कौटुंबिक भावबंध यांचे अनोखे दर्शन घडविणारी ठरली.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande