पनवेल - शेल पेट्रोल पंपावर ग्राहकाचा अपमान? अस्वच्छ पिण्याच्या पाण्यावरून तक्रार
रायगड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। कोलखे, पनवेल येथील शेल पेट्रोल पंप – सातपुते एंटरप्रायझेस येथे ग्राहकाला पिण्याचे पाणी देताना अस्वच्छ परिस्थितीचा सामना करावा लागल्याचा आणि याबाबत जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्याकडून उद्धट व अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप कर
Customer insulted at Shell petrol pump? Complaint regarding unsanitary drinking water facility.


Customer insulted at Shell petrol pump? Complaint regarding unsanitary drinking water facility.


रायगड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। कोलखे, पनवेल येथील शेल पेट्रोल पंप – सातपुते एंटरप्रायझेस येथे ग्राहकाला पिण्याचे पाणी देताना अस्वच्छ परिस्थितीचा सामना करावा लागल्याचा आणि याबाबत जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्याकडून उद्धट व अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने शेल इंडियाकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून, चौकशीसह नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.२५ वाजता ग्राहकाने सातपुते एंटरप्रायझेस येथील पंप क्रमांक ७ वर वाहनात २७.४१ लिटर डिझेल भरले. त्यासाठी ३,५८१.९४ रुपये अदा करण्यात आले. इंधन भरल्यानंतर ग्राहकाने कर्मचाऱ्याकडे पिण्याचे पाणी मागितले. पंपाच्या मागील बाजूस पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आल्याने ग्राहकाने तेथे जाऊन शोध घेतला; मात्र पाणी मिळाले नाही.

त्यानंतर कॅशियरकडे पुन्हा विचारणा केल्यानंतर ग्राहकाला कर्मचारी कक्षात जाण्यास सांगण्यात आले. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, कक्षात पुरेसा प्रकाश नसल्याने मोबाईलच्या टॉर्चचा वापर करावा लागला. तेथे पाण्याचा जार चप्पल-बुटांच्या स्टँडजवळ ठेवलेला होता. तसेच परिसरात अत्यंत दुर्गंधी असल्याचे ग्राहकाने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगत त्यांनी कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

मात्र, या तक्रारीवर समाधानकारक प्रतिसाद देण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्याने कथितरीत्या उद्धट आणि अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ग्राहकाचा अपमान झाला असून मानसिक त्रास आणि गैरसोय सहन करावी लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची नोंद Customer Feedback Form क्रमांक 66026 द्वारे करण्यात आली आहे. तक्रारीसोबत इंधनाचे बिल, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची छायाचित्रे आणि इतर पुरावे जोडण्यात आले आहेत.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून १६ ऑगस्ट रोजी रात्री १२.२० ते १२.४० या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छ व सुरक्षित आहे का, याची पाहणी करावी आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोष आढळल्यास कारवाई तसेच ग्राहकाला योग्य नुकसानभरपाई व लेखी खुलासा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रकरणाचे समाधानकारक निराकरण न झाल्यास ग्राहक मंच अथवा सक्षम प्राधिकरणाकडे कायदेशीर दाद मागण्याचा अधिकार राखून ठेवत असल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande