
यवतमाळ, 17 ऑगस्ट (हिं.स.) | शहरातील विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असताना आता नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटच्या संरक्षण भिंतीवर साकारण्यात आलेले आकर्षक ‘आय लव्ह यू दिग्रस’ हे नावदेखील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. नगर परिषद कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी अतिक्रमण वाढत असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दिग्रस शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडले असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे.
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते रस्त्याच्या या दयनीय अवस्थेने नागरिकांना मणक्याचे आजार होत असून वाहनेही नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यातच शहरातील मोकाट श्वान व मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डोकेदुखी ठरत आहे. नाल्या व परिसरातील अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भावही वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरही शिखर म्हणजे सार्वजनिक मिरवणुकीचा रस्तासुद्धा अतिक्रमणामुळे अरुंद होत चालला आहे तर नव्याने विकसित करण्यात आलेल्या भाजी मार्केटच्या परिसरालाही याची झळ बसू लागली आहे.
हा परिसर अतिक्रमण मुक्त करून भाजी मार्केटमधील ओट्यांचा लिलाव त्वरित करून येथे भाजी मार्केट सुरू करण्याची मागणी होत आहे. नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टाकाऊ पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून भाजी मार्केटच्या संरक्षण भिंतीवर आकर्षक पद्धतीने ‘आय लव्ह यू दिग्रस’ हे नाव साकारण्यात आले. त्यामुळे या परिसराला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले होते. मात्र, आता याच आकर्षक ठिकाणाभोवती अतिक्रमण वाढू लागल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य अबाधित ठेवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी