
गुंतवणूक आकर्षित करण्यासह औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा उद्देश
रायगड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यात १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी १० वाजता ही परिषद होणार असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त जी. एस. हरळय्या यांनी दिली.
शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आयोजित या परिषदेचा उद्देश महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, रायगड जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करणे, औद्योगिक विकासाला गती देणे तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा आहे.
गतवर्षी एप्रिल २०२५ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदांमध्ये तब्बल ३,७४२ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून सुमारे १ लाख २७ हजार ३२२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित झाली होती. या माध्यमातून ३ लाख २० हजार ५६१ रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
रायगडमधील परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल तसेच सहआयुक्त (उद्योग व सेवा), कोकण विभाग, संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत. परिषदेत प्रस्तावित गुंतवणूकदारांचे उद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच गुंतवणुकीशी संबंधित विविध शासकीय धोरणांचे सादरीकरणही केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील गुंतवणूकदार, निर्यातदार आणि नवउद्योजकांनी या परिषदेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)