
अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)
राणा दाम्पत्य आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमधील ‘सोशल मीडिया वॉर’ चर्चेत
निवडणुकीच्या काळात राजकारण तापणे नवीन नाही. मात्र, सध्या कोणतीही निवडणूक नसतानाही अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः राणा दाम्पत्य आणि स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे या ‘सोशल मीडिया वॉर’मध्ये श्वान, बैल, साप, झाडे आणि रोपट्यांसारख्या निसर्गातील घटकांचीही ‘एण्ट्री’ झाल्याने राजकारणाची रंगत आणखी वाढली आहे.नुकत्याच एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघात भविष्यात परिवर्तन होणार असल्याचे विधान करत भाजपाचे आमदार राजेश वानखडे यांना अप्रत्यक्षपणे डिवचले. त्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी, “मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, मैं फिर लौट के आऊँगा”, अशी शेरोशायरी करत राजकीय वातावरण आणखी तापविले.राणा दाम्पत्याच्या या वक्तव्यांनंतर भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यावेळी आमदार प्रवीण पोटे यांनी, “बैलबंडीच्या खालून चालणारा श्वान आपणच बैलबंडी चालवत असल्याच्या भ्रमात असतो”, असे उदाहरण देत रवी राणा यांच्यावर निशाणा साधला.यानंतर नवनीत राणा यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर रवी राणा यांचा फोटो ठेवत, “दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है, लेकिन मैं खेल नहीं, खेल खेलनेवाले ही बदल देता हूँ”, अशा आशयाच्या ओळी पोस्ट केल्या. त्यामुळे दोन्ही बाजूंमधील शीतयुद्ध सोशल मीडियावरही उघडपणे दिसू लागले.दरम्यान, रवी राणा एका खुर्चीवर ऐटीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोसोबत, “हमने तो उन साँपों का भी साथ दिया है, जो आज हमें डंसने की सोच रहे हैं”, अशा आशयाच्या ओळी असल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले.याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी दोन व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामध्ये, “पुराने पेड़ों का मजाक उड़ा रहे थे नये पौधे, इन्होंने अभी तूफान के झटके नहीं देखे”, तसेच “मेरे लहजे पर सवाल मत उठाओ, भरी सभा में साँप को साँप कहने की हिम्मत रखती हूँ”, अशा काव्यमय ओळींच्या माध्यमातून विरोधकांना इशारा देण्यात आला.एकूणच, अमरावतीच्या राजकारणात आता आरोप-प्रत्यारोपांसोबत श्वान, बैल, साप, झाडे आणि रोपट्यांचीही चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ आणि सूचक वक्तव्यांच्या माध्यमातून सुरू असलेले हे शीतयुद्ध आगामी काळात आणखी तीव्र होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, राजकीय संघर्षाची ही भाषा आता वैचारिक मुद्द्यांऐवजी वैयक्तिक आणि प्रतीकात्मक टीकेकडे झुकत असल्याने राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी