“आज पांडुरंग मला आणि माझ्या कुटुंबाला पावला”- गिरीश महाजन
नाशिकचे पालकमंत्रिपद मिळाल्यावर दिली भावनिक प्रतिक्रिया सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : “विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मतदारसंघातील सुमारे १५ हजार नागरिकांसह पंढरपुरात आलो आहे. दर्शन घेतल्यानंतर नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी पत्नीने सर्वप्रथम मल
girish


नाशिकचे पालकमंत्रिपद मिळाल्यावर दिली भावनिक प्रतिक्रिया

सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : “विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मतदारसंघातील सुमारे १५ हजार नागरिकांसह पंढरपुरात आलो आहे. दर्शन घेतल्यानंतर नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी पत्नीने सर्वप्रथम मला दिली. आज खरोखरच पांडुरंग मला आणि माझ्या कुटुंबाला पावला,” अशी भावनिक प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात दिली.

पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर नाशिक आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला अधिक वेग देण्याचा निर्धार महाजन यांनी व्यक्त केला. यापूर्वी आपल्यावर कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी होती. आता पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी आणखी वाढली असून, नाशिक आणि कुंभमेळ्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाशिक शहरातील सुमारे ८० टक्के खड्डे बुजविण्यात आले असून, उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. नाशिक शहर कायमस्वरूपी खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे करण्यात येणार असून, नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सुमारे साडेचार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन असल्याची माहितीही महाजन यांनी दिली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक, सुरक्षा आणि नागरिक तसेच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्रीपदासाठी आपण कधीही आग्रह धरला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री आणि पक्षाने आपल्यावर ही जबाबदारी सोपविली आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

आगामी कुंभमेळा ऐतिहासिक स्वरूपाचा होणार असून, या निमित्ताने नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. या कामात कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासनही महाजन यांनी दिले.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनानंतरच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची बातमी मिळाल्याने हा दिवस आपल्या आणि कुटुंबासाठी विशेष असल्याचे सांगत महाजन यांनी या योगायोगाबद्दल भावनिक भावना व्यक्त केली.--------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande