
लातूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
चाकूर तालुक्यातील लातूर रोड परिसरातील शेतकरी कुटुंबातील अंतश्वर विठ्ठलराव सोनटक्के यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांची दुय्यम निबंधक अधिकारी म्हणून निवड झाली असून, या यशाने सोनटक्के कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
वडील विठ्ठलराव सोनटक्के यांनी आयुष्यभर शेतीत काबाडकष्ट करून कुटुंबाचा संसार उभा केला. शेतात घाम गाळताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाला मात्र कधीही कमी पडू दिले नाही. शेतीतून मिळालेले संस्कार आणि त्यातून मिळालेली शिक्षणाची दिशा या बळावर अंतश्वर यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
अनेक अडचणी, अभ्यासातील सातत्य आणि कठोर मेहनतीनंतर त्यांनी एमपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला. अंतश्वर यांच्या यशात त्यांचे बंधू सुमित सोनटक्के आणि महेश्वर सोनटक्के यांनी मोलाची साथ दिली. शेतकरी कुटुंबातील मुलगा जिद्दीने अधिकारी होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. मुलगा अधिकारी झाल्याची बातमी कळताच आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले, तर वडिलांच्या कष्टाचे सार्थक झाल्याची भावना कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसून आली.
शेतकरी बापाच्या घामाला अधिकारीपदाच्या रूपाने फळ मिळाले असून, आईच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू हीच या यशाची खरी पावती आहे. 'बापाच्या हाताला माती लागली, म्हणून मुलाच्या हातात यशाची लेखणी आली', अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत परिसरातून अंतश्वर सोनटक्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis