
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) | दक्षिण सोलापूर : तब्बल ३५९ शिवमूर्ती कोरलेले भव्य शिवलिंग असलेले हत्तरसंग कुडल हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. बहुमुखी शिवलिंग असलेले हे ठिकाण जगातील एकमेव स्थान असल्याचा दावा केला जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी संगमेश्वर आणि हरीहरेश्वराच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
सोलापूर शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हत्तरसंग कुडल येथे संगमेश्वर मंदिर आहे. श्रावण सोमवारी पहाटेपासूनच दर्शन आणि जलाभिषेकासाठी भाविकांची गर्दी होत असून, मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून जात आहे.
हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिर पुरातन वास्तुकलेचा ठेवा मानले जाते. या ठिकाणी सीना आणि भीमा नद्यांचा सुमारे ९० अंशांचा काटकोन संगम होतो. त्यामुळे धार्मिक महत्त्वासोबतच भौगोलिकदृष्ट्याही या परिसराचे वेगळेपण आहे.
नदीसंगम, प्राचीन मंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग यामुळे हत्तरसंग कुडलला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हत्तरसंग कुडल हे सामाजिक समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांचे प्रमुख जन्मस्थान मानले जाते. त्यामुळे या परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वासोबतच सामाजिकदृष्ट्याही विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
दक्षिण सोलापूरमधील बरूर, हत्तरसंग, कुडल, अक्कलकोट तालुक्यातील धारसंग तसेच कर्नाटकातील इंडी तालुक्यातील शिरगुर या गावांच्या शिवपरंपरेशी या मंदिराचे नाते जोडले गेले आहे.
मंदिर परिसरातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य शिवलिंग. उत्खननादरम्यान ३५९ शिवमूर्ती कोरलेले शिवलिंग आढळल्याचे सांगितले जाते. या वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंडीला ‘विश्वरूप दर्शन’ शिवपिंड म्हणूनही संबोधले जाते.
श्रावण महिन्यातील सोमवारी या वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक हत्तरसंग कुडल येथे दाखल होत आहेत. धार्मिक श्रद्धेसोबतच प्राचीन वास्तू आणि शिवलिंगाचे वैशिष्ट्य पाहण्यासाठीही भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
श्रावणातील वाढत्या गर्दीमुळे हत्तरसंग कुडल परिसर सध्या भक्तिमय वातावरणाने फुलून गेला असून, हे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड