
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच नागरिकांकरिता आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिरांमध्ये 310 रुग्णांची विविध आजारांसाठी तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा, मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये 128 रुग्णांची फिजिओथेरपी व अॅक्युपंक्चर उपचार देण्यात आले, 83 रुग्णांची नेत्र तपासणी, 7 रुग्णांची इंडोस्कोपी तपासणी तसेच 92 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.
मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी
रामेश्वर नाईक कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर राबविण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026’च्या आयोजक डॉ. सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.
मान्यवरांची शिबिरास भेट
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे, खासदार डॉ. अजितजी गोपछडे, महापौर कविता मुळे, मा. रामेश्वर नाईक कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मुंबई, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन शिबिरातील आरोग्य सेवा व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी मान्यवरांनी शिबिरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासण्या, निदान व उपचार व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. तसेच शिबिरातील विविध आरोग्य सेवा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी शिबिराचे आयोजक, समन्वयक, आरोग्य सेवा देणाऱ्या विविध संस्था तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
विविध यंत्रणांचा प्रभावी समन्वय
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे आणि समन्वयक संभाजी लोंढे यांनी शहरातील खासगी रुग्णालये, वैद्यकीय शैक्षणिक संस्था व विविध सेवाभावी संस्थांशी सातत्याने समन्वय साधून शिबिरांचे नियोजन, आयोजन आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली.
आरोग्य संस्थांचे मोलाचे योगदान
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्नित सनराईज ग्लोबल हॉस्पिटल, नांदेड येथील डॉ. त्र्यंबक दापकेकर व त्यांचे सहकारी, नांदेड फिजिओथेरपी कॉलेज, पांगरीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. विजय भारतीया, आरोग्य भारती नांदेड, लायन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड येथील डॉ. सुलोमान व त्यांचे सहकारी, गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडद्वारा संचालित फिरते इंडोस्कोपी रुग्णालयातील डॉ. नितीन जोशी व त्यांचे सहकारी तसेच गुरु सेवा प्रतिष्ठान व साई अॅक्युपंक्चर उपचार केंद्र नांदेड येथील डॉ. शकुंतला झंवर व डॉ. मल्लेश कर्रे तसेच सप्तरंग सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान लाभले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis