राज्यभर २१ ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर
जलसंवर्धनासाठी लोकचळवळीचे आवाहन रायगड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. मृद व
Maha-Walkathon-Walk-for-Wat


जलसंवर्धनासाठी लोकचळवळीचे आवाहन

रायगड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो’ ही यंदाची थीम आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न असून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या वेळी सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे प्रमुख असतील.

या उपक्रमात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, व्यापारी तसेच विविध सामाजिक व क्रीडा संघटनांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

याशिवाय रोटरी व लायन्स क्लब, रनिंग व सायकलिंग क्लब तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘महा वॉकेथॉन’साठी क्यूआर कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे.

जलसंवर्धनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावर #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मृदसंधारण, जलसंधारण आणि पाणी बचतीबाबत जनजागृती वाढवून नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या वॉकेथॉनमुळे जलसंवर्धनाच्या चळवळीला राज्यभर व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande