वामनदादा कर्डकांचे कार्य सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी ज्योत : महापौर सय्यद इकबाल
परभणी, १७ ऑगस्ट (हिं.स.) : महाकवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकरी चळवळीत केलेले योगदान अनन्यसाधारण आहे. बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांवर तब्बल दहा हजार गीते लिहून त्यांनी गीतांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची ज्योत पेटवली. डॉ. बाबास
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’चा क्रांतिकारी नारा तळागाळात पोहोचविणारे महाकवी वामनदादा : महापौर सय्यद इकबाल


परभणी, १७ ऑगस्ट (हिं.स.) : महाकवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकरी चळवळीत केलेले योगदान अनन्यसाधारण आहे. बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांवर तब्बल दहा हजार गीते लिहून त्यांनी गीतांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची ज्योत पेटवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा क्रांतिकारी संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवून तो जनमानसात रुजविण्याचे महान कार्य त्यांनी केले, असे गौरवोद्गार परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी काढले.

अभिरा फाउंडेशन, परभणीच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त मागील १८ वर्षांपासून आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीत कला, गीत-संगीत आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या गायक, शाहीर व कार्यकर्त्यांना ‘महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा पुरस्कार सोहळा सोमवार, १७ ऑगस्ट रोजी बी. रघुनाथ सभागृहात उत्साहात पार पडला.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर सय्यद इकबाल होते.

भारतीय दलित पँथरचे उपाध्यक्ष संजय कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून परभणी मनपाचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष मिलिंद बामणीकर, आयोजक भंते मुदितानंद, रिपब्लिकन सेनेचे नेते यशवंत भैय्या भालेराव, पीआरपीचे राज्य संघटक गौतम मुंडे, डॉ. सुनील तुरुकमाने, भाई कीर्तीकुमार बुरांडे, नगरसेवक अविनाश अवचार, माजी नगरसेवक नागेश सोनपसारे, प्रा. डॉ. रामप्रसाद खंदारे आणि दीपक वारकरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

गीत-संगीताच्या माध्यमातून चळवळ

तळागाळापर्यंत

प्रास्ताविकात भंते मुदितानंद यांनी अभिरा फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली. मागील १८ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गीत-संगीताच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या गुणवंत शाहीर व गायकांचा सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाकवी वामनदादा कर्डक यांचे महान कार्य, त्यांचा त्याग, समर्पण आणि समाजासाठीचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सदाशिव भालेराव (माजलगाव), संभाजी खिल्लारे (जिंतूर-बामणी), प्रमोद साळवे (गंगाखेड), शाहीर माधव वाढवे (हदगाव, जि. नांदेड) आणि अजयकुमार गंडले (परळी वैजनाथ) यांना मान्यवरांच्या हस्ते ‘महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थींना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत अभिरा फाउंडेशनच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी केले. यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांच्या वतीने उपस्थितांसाठी मोफत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande