
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा पुनर्वसन खात्याच्या कथित मनमानी आणि संशयास्पद कारभारामुळे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या मालकीच्या आठ एकर शेतजमिनीपैकी तीन एकर जमीन कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मोबदला न देता परस्पर संपादित करून तिचे वाटप व विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा संबंधित शेतकऱ्याने केला आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ बाधित शेतकरी सिद्धेश्वर मेटकरी यांनी स्वातंत्र्य दिनापासून प्रांत कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेटकरी यांच्या कुटुंबाची आठ एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यापैकी तीन एकर जमिनीबाबत जिल्हा पुनर्वसन खात्याच्या अभिलेखांमध्ये जमीन संपादित झाल्याची नोंद करण्यात आल्याचा आरोप आहे.
मेटकरी यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात ही जमीन संपादित करण्यात आलेली नाही. जमीन संपादनाची कोणतीही पूर्वसूचना त्यांना देण्यात आली नाही तसेच त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही.
याशिवाय, संबंधित जमिनीच्या संपादनासंदर्भात कोणताही अवार्ड तयार करण्यात आलेला नसल्याचा दावाही मेटकरी यांनी केला आहे.
जमीन संपादनाची प्रक्रिया, अभिलेखांमधील नोंदी आणि संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलेला मोबदला याबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आपल्या मालकीच्या जमिनीबाबत झालेला कथित अन्याय दूर करून संबंधित जमीन आणि अभिलेखांबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करत सिद्धेश्वर मेटकरी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे मंगळवेढ्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड