
जळगाव, 17 ऑगस्ट (हिं.स.) | सध्याची परीस्थिती अत्यंत भयावह आहे. १७ ते ३० या वयोगटातील तरूण व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनांचे हे वळण सिन्थेटीक पध्दतीकडे वळाले असून पोलीस विभागाने संकल्प केलेल्या मिशन राइज एक्सचे यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा पोलीस दल आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन राइज एक्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक केदार बारबले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मिशन राइज या लोगोचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील उत्कर्ष भोसले, प्राची मुरळे, कौस्तुभ वडगावकर, ओम चौधरी, पायल यांची मिशन राइजसाठी निवड करण्यात आली. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी व्यसनांची विविध कारणे, त्यामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम आणि उपाययोजना याविषयी चलचित्रफितीद्वारे सादरीकरण केले. यासोबतच व्यसनांना नकार देण्याची हिंमत ठेवा असे आवाहनही डॉ. हुमेद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थ सेवन करणार्यांविरोधात कायद्यात नेमक्या कुठल्या प्रकारच्या शिक्षा आहेत याविषयी चलचित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह मान्यवरांना नशामुक्तीची शपथही दिली.व्यसनांना नाही म्हणणे हाच योग्य मार्ग असल्याचे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हे समाजासाठी रोल मॉडेल आहेत. त्यामुळे रोल मॉडेल असलेल्या विद्यार्थ्यांनी नशामुक्तीच्या या अभियाना सक्रीय सहभागी व्हावे. गोदावरी हेल्थ सिटीचा परिसर हा नशामुक्त असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमात ज्यु. मकरंद अनासपुरे यांनी विविध राजकारणी, अभिनेते यांच्या मिमीक्रीच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर