
अमरावती, १७ ऑगस्ट (हिं.स.)। गावाच्या सौंदर्यात भर घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर मोठ्या उत्साहात करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची अवस्था अवघ्या महिनाभरातच दयनीय झाली आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतीने रोपांना सुरक्षाजाळ्या लावून पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, देखभालीअभावी अनेक सुरक्षाजाळ्या वाऱ्यामुळे पडल्या असून मोकाट जनावरांनी अनेक रोपे फस्त केली आहेत. त्यातच दुभाजकावर रानटी गवत वाढल्याने संपूर्ण परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे.
गावातील बसस्थानकापासून अंजनगाव आणि परतवाड्याच्या दिशेने दोन्ही बाजूंना सुमारे ५०० मीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. वृक्षारोपणानंतर ग्रामपंचायतीने प्रत्येक रोपाला सुरक्षाजाळी लावली होती. तसेच एक-दोन दिवसांच्या अंतराने टँकरद्वारे पाणी देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.
मात्र, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षाजाळ्या कोसळल्या. त्यानंतर दुभाजकावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी अनेक रोपे खाऊन टाकली. त्यामुळे वृक्षारोपणाचा मूळ उद्देशच धुळीस मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दुभाजकाचे रंगकाम केल्यामुळे सुरुवातीला परिसर आकर्षक दिसत होता. त्यातच गावातील काही स्वयंघोषित नेते आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी वृक्षारोपण केले होते. रोपांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती. मात्र, अवघ्या महिनाभरातच या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याने दुभाजकाची पुन्हा दुरवस्था झाली आहे.
रानटी गवताने वाढवली विद्रूपता
दुभाजकावर मोठ्या प्रमाणात वाढलेले रानटी गवत परिसराच्या विद्रूपीकरणात आणखी भर घालत आहे. गवत नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीकडून फवारणी करण्यात आली असली, तरी नियमित देखभालीअभावी समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे.गेल्या चार वर्षांपासून दुभाजकावर चक्राकार पद्धतीने वृक्षारोपण करणे, ट्री गार्ड बसविणे, काही दिवस रोपांची देखभाल करणे आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणे, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी वृक्षारोपणावर खर्च होऊनही त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्याचे चित्र आहे.
वृक्षारोपणापेक्षा संगोपन गरजेचे
केवळ वृक्षारोपण करून फोटो काढण्यापेक्षा लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकाचे सौंदर्य टिकवण्यासाठी ग्रामपंचायत, संबंधित विभाग आणि वृक्षारोपणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने दीर्घकालीन देखभालीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अन्यथा दरवर्षी होणारे वृक्षारोपण केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी