
अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)
अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी शाळेत यावे; आठ दिवसांत विद्यार्थिनींना पुन्हा शाळेत आणण्याचा प्रयत्न — आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत
मेळघाटातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना ‘भूतबाधा’ झाल्याची अफवा पसरल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीचे गूढ आता वैद्यकीय तपासणीतून उलगडले आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य पथकाने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची तपासणी केली. यामध्ये सहा विद्यार्थिनींमध्ये मानसिक तणावाशी संबंधित विविध लक्षणे आढळून आली आहेत.तपासणीदरम्यान विद्यार्थिनी सतत रडणे, भीती वाटणे, उदासपणा, विस्मरण तसेच विविध शारीरिक तक्रारी अशा लक्षणांनी त्रस्त असल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणीनंतर या विद्यार्थिनींमध्ये Dissociative Conversion Disorder असल्याचे निदान करण्यात आले. मानसिक तणाव, अभ्यासाचा दबाव आणि शाळेतील घडामोडींचा मानसिक परिणाम यामागे कारणीभूत असण्याची शक्यता वैद्यकीय अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.विद्यार्थिनींना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी त्यांना स्वतंत्र ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार आणि समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच पालकांचेही समुपदेशन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘भूतबाधा’ किंवा अन्य अंधश्रद्धेच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या प्रकरणावर आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले. शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अनीस) माध्यमातून विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.येत्या आठ दिवसांत विद्यार्थिनींना पुन्हा शाळेच्या वातावरणात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत त्यांना सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पालक, शिक्षक आणि प्रशासनाने संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अफवांपेक्षा वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवावा, असेही आदिवासी विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी