
नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नाशिक येथील स्वामी नारायण बँक्वेट हॉल,आडगाव नाका,पंचवटी येथे आयोजित करण्यात आली आहे.आगामी काळातील संघटनात्मक तयारी,पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत (एसआयआर) या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होणार आहे.
या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी आणि एसआयआर प्रदेश संयोजक किरीटजी सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक म्हणून पाहिले जात आहे.
बैठकीमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बाबी,आगामी कार्यक्रम,बूथ स्तरावरील संघटन मजबूत करण्याचे नियोजन,आगामी राजकीय आव्हानांसाठीची तयारी तसेच एसआयआर संदर्भातील नियोजन व कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मतदार यादीतील अचूकता, कार्यकर्त्यांची भूमिका आणि एसआयआर प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी, विभाग संयोजक व सहसंयोजक, आमदार,खासदार,प्रदेश मोर्चा अध्यक्ष,जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, एसआयआर प्रदेश व जिल्हा समिती सदस्य, एसआयआर विधानसभा प्रभारी तसेच बीएलए-1 या अपेक्षित श्रेणीतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
विशेषतः आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढविणे, प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची रचना अधिक सक्षम करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे या दृष्टीने बैठकीत दिशा निश्चित केली जाणार आहे. वरिष्ठ नेते पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय होणार आहे.
आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. दरम्यान,नाशिकमध्ये होत असलेल्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजप संघटनेकडूनही आवश्यक तयारी करण्यात येत असून,वरिष्ठ नेतृत्वाच्या स्वागतासाठी तसेच बैठकीच्या नियोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील भाजप संघटनेला आगामी काळासाठी दिशा देणारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ही बैठक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI