
रत्नागिरी, 17 ऑगस्ट (हिं.स.) । नेवरे (ता. रत्नागिरी) येथील मारुती गणपत ढेपसे (वय ५६ वर्षे) यांना आरएचपी फाउंडेशनच्या प्रयत्नांतून निओ मोशन व्हीलचेअर इलेक्ट्रिक गाडी उपलब्ध झाली.
श्री. ढेपसे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्यांचे आई-वडील शेती करायचे. त्यांना एक विवाहित बहीण आहे. दहावीनंतर श्री. ढेपसे यांनी कोतवडे येथे स्वतःचे टू-व्हीलर रिपेअरिंग गॅरेज सुरू केले. कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय उभा केला आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास सुरुवात केली. सन १९९८ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे. मुलगा शुभम सध्या गॅरेजचा व्यवसाय सांभाळत आहे.
गॅरेजमध्ये काम करत असताना जड वस्तू उचलल्यामुळे मारुती यांच्या उजव्या पायात कमजोरी जाणवू लागली. २००४ पासून हळूहळू पायातील ताकद कमी होत गेली. अखेर २०१२ मध्ये अचानक दोन्ही पायातील पूर्ण ताकद गेली आणि पाय लुळे पडले. कमरेपासून खालच्या भागातील संवेदना कमी झाल्या. लघवी व शौचावरील नियंत्रणही गेले. चालता येणे पूर्णपणे बंद झाले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी पत्नीवर अवलंबून राहावे लागत होते. मिरज येथे फिजिओथेरपीसाठी उपचार घेतले; मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही. सन २०१५ मध्ये आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ढेपसे यांची परिस्थिती समजून घेतल्यानंतर संस्थेतर्फे त्यांना व्हीलचेअर देण्यात आली. मुंबईतील हाजी अली हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर पत्नीला सोबत घेऊन ते सुमारे पाच महिने मुंबईतील हाजी अली येथे उपचारासाठी राहिले. तेथे हॉस्पिटलतर्फेही त्यांना व्हीलचेअर मिळाली. व्हीलचेअरच्या साहाय्याने ते बाहेर पडू लागले, इतरांशी संवाद साधू लागले आणि त्यांच्या मानसिक स्थितीतही सकारात्मक बदल होऊ लागला. पाच महिन्यांच्या उपचारानंतर ते पुन्हा आपल्या घरी परतले.
घरी आल्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायाशी नाते जोडले. मात्र सतत व्हीलचेअरवर बसून राहिल्याने २०२५ मध्ये पुन्हा दोन बेडसोर झाले. दररोज ड्रेसिंग करूनही जखमा बऱ्या होत नसल्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता यावे, शरीरावर अतिरिक्त दाब पडू नये आणि भविष्यात जखमा होण्याचा धोका कमी व्हावा, यासाठी त्यांना अधिक सोयीची इलेक्ट्रिक व्हीलचेअर अत्यंत गरजेची होती. गरज पाहून आरएचपी फाउंडेशनने जबाबदारी घेतली. अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांचे नाव निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी सुचविले. मात्र वयोमर्यादेमुळे त्यांची अधिकृत निवड होऊ शकली नाही.
परंतु केवळ वयाची अडचण म्हणून गरजू व्यक्तीला मदतीपासून वंचित ठेवायचे नाही, या भावनेतून त्यांच्या परिस्थितीची आणि निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरची असलेली अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन देणगीदारांच्या सहकार्याने मारुती ढेपसे यांना निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली.
अपंगत्वामुळे आयुष्य थांबत नाही; योग्य आधार, साधने आणि आत्मविश्वास मिळाला तर स्वावलंबनाची नवी वाट निर्माण करता येते. मारुती ढेपसे यांची संघर्षमय वाटचाल आणि निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअरच्या माध्यमातून मिळालेली नवी दिशा ही त्याचेच प्रेरणादायी उदाहरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी