
‘क्विड प्रो क्वो’ टाळून व्यावसायिक भूमिकेशी प्रामाणिक राहावे
एस. के. कुलकर्णी यांचा नव्वदी निमित्त सत्कार
पुणे, १७ ऑगस्ट (हिं.स.) : पत्रकारांचे राजकारण्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असले तरी ते नेहमीच प्रामाणिक आणि पारदर्शक असावेत. पत्रकारितेत कोणत्याही स्वरूपाचा ‘क्विड प्रो क्वो’ म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या बदल्यात काहीतरी मिळविण्याची अपेक्षा ठेवू नये. पत्रकारांनी आपल्या व्यावसायिक भूमिकेशी कोणतीही तडजोड न करता काम करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी (सदाशिव केशव कुलकर्णी) यांच्या नव्वदी निमित्त आयोजित सत्कार समारंभात गडकरी बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्या वतीने या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
गडकरी म्हणाले की, पत्रकारांनी कोणत्याही घटनेची बातमी देताना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी. प्रत्यक्ष पाहणी आणि सत्य परिस्थितीची पडताळणी केल्यानंतरच विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ बातमी देता येते. पत्रकारितेतील विश्वासार्हता टिकविण्यासाठी तथ्यांची पडताळणी आणि बातमी मांडताना प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे.
एस. के. कुलकर्णी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, लोकशिक्षण आणि वैचारिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गडकरी यांनी नमूद केले. काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप आणि माध्यमे बदलली असली तरी कुलकर्णी यांनी सत्य, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांशी कायम प्रामाणिक राहून पत्रकारिता केली, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ आणि निडर संपादकांच्या अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणातून तसेच मार्गदर्शनातून समाजाला सातत्याने दिशा मिळाली, असे गौरवोद्गारही गडकरी यांनी काढले. पत्रकारांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती मिळवावी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने ती वाचकांसमोर मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु