पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष तपासणी मोहीम
पिंपरी, 17 ऑगस्ट (हिं.स.)पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महापालि
dengu


पिंपरी, 17 ऑगस्ट (हिं.स.)पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महापालिका मुख्य इमारत, आवार, वाहनतळ आणि परिसरातील पाणी साचणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान कूलरमधील पाणी, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, कुंड्यांखालील ट्रे, पाण्याच्या टाक्या, वापरात नसलेली भांडी, कार्यालयीन परिसर, वाहनतळ तसेच अन्य ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आढळून आले, तेथील पाणी तातडीने काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

डेंग्यू आणि मलेरियावर आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह सर्व शासकीय व सार्वजनिक आस्थापनांच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या पथकांनी महापालिका मुख्यालयातील विविध विभाग, कार्यालयीन परिसर, वाहनतळ आणि आजूबाजूच्या भागाची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. परिसरात स्वच्छता राखण्यासह भविष्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande