
बीड, १७ ऑगस्ट (हिं.स.) : श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि शेतकरी नेते राजु शेट्टी यांची वैद्यनाथ मंदिरात भेट घेतली. हे दोघेही वैद्यनाथ मंदिरात एकाच वेळी दर्शनासाठी आले होते. या सदिच्छा भेटीत केवळ योगायोग की, राजकीय गणिते आहेत यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. श्रावण सोमवारनिमित्त परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी प्रभू श्री वैद्यनाथांचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी मराठवाड्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकरी संकटात असून, शेतकरी बळीराजावरील हे संकट दूर करावे, अशी प्रार्थना त्यांनी वैद्यनाथ चरणी केली. दरम्यान, श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेले शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची धनंजय मुंडे यांनी सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांची भेट सहज आणि अचानक झाल्याचे दिसत असले तरी राजकीय वर्तुळात या भेटीवरून चांगलीचचर्चा रंगली आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis