
कोल्हापूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)
फुटबॉल खेळामध्ये कोल्हापूरने वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामध्ये प्रॅक्टिस क्लबचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी. व्ही. यांनी व्यक्त करतानाच फुटबॉल खेळामध्ये भारताने चांगले प्रगती केली असून लवकरच भारतीय संघ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होईल असा विश्वास ही व्यक्त केला. त्या कोल्हापुरातील प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतक महोत्सवासाठी बनवण्यात आलेल्या विशेष लोगोच्या अनावरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी महापौर रुपाराणी निकम होत्या तर WIFA च्या अध्यक्ष आणि AIFF सदस्य मधुरिमाराजे छत्रपती, अरुंधती महाडिक, वैशाली क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगळवार पेठेतील शुभंकरोति कार्यालयात प्रॅक्टिस क्लबचा शतक महोत्सवी लोगोचा अनावरण सोहळा क्लबचे आजी-माजी खेळाडू, पंच, प्रशिक्षक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत जोशपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना प्रिया पी. व्ही. म्हणाल्या की फुटबॉल खेळासाठी कोल्हापुरात असलेले वातावरण निश्चितच चांगले फुटबॉलपटू घडवण्यासाठी पोषक आहे. कोल्हापूरातील फुटबॉल प्रेम, प्रॅक्टिस क्लबचा खेळातील संघर्ष आणि जिद्द, यशाचा १०० वर्षाचा इतिहास देशासाठी प्रेरणादायी आहे. विशेषता महिलांमध्येही असलेली फुटबॉल खेळाबद्दलची आस्था कौतुकास्पद आहे. यामुळे राज्य आणि देशपातळीवरील महिला फुटबॉल संघात येथील मुली निश्चित स्थान मिळवतील.
यावेळी मधुरिमाराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने फुटबॉलसाठी दिलेले प्रोत्साहन आणि प्रत्यक्ष सहभाग याबाबत माहिती देऊन कोल्हापूर स्पोर्ट्स असोशियन मार्फत होणाऱ्या के एस ए लीग स्पर्धेच्या परंपरेला आता महिला फुटबॉल लीग स्पर्धा आयोजित करून अधिक समृद्ध करणार असल्याचे सांगितले. महापौर रूपाराणी निकम यांनी कोल्हापूरच्या फुटबॉल खेळात प्रॅक्टिस क्लबचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून यापुढे महापालिकेतर्फे प्रॅक्टिस क्लबला आवश्यक ती सर्व मदत करू असे आश्वासन दिले. अरुंधती महाडिक यांनी फुटबॉल खेळासाठी प्रॅक्टिस क्लबच्या अनेक पिढ्यांनी संघर्ष केला यामुळेच खिलाडूवृत्ती आणि शिस्त यातून प्रॅक्टिस क्लब शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar