खासदार प्रणिती शिंदे यांचे खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : जुळे सोलापुरातील रुबीनगर परिसरातील गणेश बिल्डर्स क्रमांक तीन आणि अन्य वसाहतींना जोडणारा रस्ता, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच ड्रेनेजलाइन शेजारील प्लॉटधारकाने उखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नावरून वाद चिघळला
sdfg


सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : जुळे सोलापुरातील रुबीनगर परिसरातील गणेश बिल्डर्स क्रमांक तीन आणि अन्य वसाहतींना जोडणारा रस्ता, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच ड्रेनेजलाइन शेजारील प्लॉटधारकाने उखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नावरून वाद चिघळला असून, नागरिकांच्या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी थेट रस्त्याच्या उखडलेल्या भागातील खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.

या जागेतील रस्त्याच्या वाटेवरून नागरिक आणि संबंधितांकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, वसाहतीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

“जोपर्यंत वसाहतीमधील नागरिकांना वाट मिळत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही,” अशी भूमिका खासदार प्रणिती शिंदे आणि आंदोलनकर्त्या नागरिकांनी घेतली आहे.

महापालिका प्रशासनाकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महापालिका कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रहिवाशांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले; मात्र प्रत्यक्ष आत्मदहन करण्यात आले नाही.

या आंदोलनाकडे पालकमंत्री, महापालिका आयुक्त, स्थानिक आमदार, महापौर आणि नगरसेवकांनी लक्ष दिले नसल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. त्यानंतर नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधून निवेदन दिले.

शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रस्ता, पाणी आणि ड्रेनेजच्या प्रश्नाची गंभीरता लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या मागणीला पाठिंबा देत थेट आंदोलनात सहभाग घेतला.

खासदार शिंदे यांनी नागरिकांना रस्ता मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासन आणि संबंधितांकडून या वादावर कोणता तोडगा काढला जातो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande