शाश्वत शेती, वनसंपत्तीच्या संवर्धनातून गावाला समृद्ध करा - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। प्रत्यक्ष फिरून शिवारफेरी पूर्ण करा, आपल्या गावाला काय हवं त्याचा आराखडा तयार करा, वनोपजाचे संरक्षण व विक्रीतून गावाला समृद्ध करा, रासायनिक खते व औषधी टाळून जीवामृत, दसपर्णी अर्क वापरा, खर्च कमी करून उत्पन्न वाढवा, गटशेती
शाश्वत शेती, वनसंपत्तीच्या संवर्धनातून गावाला समृद्ध करा - नांदेड जिल्हाधिकारी


नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। प्रत्यक्ष फिरून शिवारफेरी पूर्ण करा, आपल्या गावाला काय हवं त्याचा आराखडा तयार करा, वनोपजाचे संरक्षण व विक्रीतून गावाला समृद्ध करा, रासायनिक खते व औषधी टाळून जीवामृत, दसपर्णी अर्क वापरा, खर्च कमी करून उत्पन्न वाढवा, गटशेती करा, सामूहिक वनसंपत्तीचे नियोजन, जैवविविधतेचे संवर्धन, लघुवनोपजाचे व्यवस्थापन, पारंपरिक ज्ञानाचा वापर आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून घेणे हेच आजच्या कार्यशाळेचं फलित आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक वनहक्क अंमलबजावणी व व्यवस्थापन समिती (CFRMC) प्रशिक्षण कार्यशाळेत किनवट येथे मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्यावतीने किनवट पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी बी. सरवनन, तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांची प्रमुख उपस्थिति होती.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कर्डिले असे म्हणाले की, निसर्गातील जीवसृष्टीची विविधता म्हणजे जैवविविधता होय. किनवट परिसरातील जंगले, बांबू, साग, विविध औषधी वनस्पती, वाघ, बिबट्या, अस्वल, लांडगा, हरीण, मोर, विविध पक्षी व कीटक हे सर्व मिळून त्या परिसराची जैवविविधता तयार करतात. तेव्हा याची जपणूक झाली पाहिजे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande