
पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)पुणे-कोल्हापूरदरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेचा दर्जा आता रद्द करण्यात येणार असून ही गाडी २० ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. विशेष दर्जामुळे सध्या या गाडीचे तिकीट दर एक्स्प्रेसच्या तुलनेत अधिक आहेत. नियमित सेवा सुरू झाल्यानंतर तिकीट दर मेल-एक्स्प्रेसच्या दराप्रमाणे होणार असल्याने प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाने या गाडीला २० ऑक्टोबरपासून नव्या क्रमांकासह दररोज धावण्यास मंजुरी दिली आहे.
सध्या या रेल्वेचा क्रमांक ०१०२३/२४ असून नियमित सेवेसाठी तो ११४१९/२० असा करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ११४१९ पुण्याहून रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ८ मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ११४२० कोल्हापूरहून रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. ही रेल्वे दररोज धावणार असल्याने पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेष दर्जा रद्द झाल्याने तिकीट दर तुलनेने कमी होणार असल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा विशेष फायदा मिळणार आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु