पुण्यात २१ ऑगस्टला जलसंधारण जनजागृती पदयात्रा
पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, मातीचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विविध जलसंधारण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’,
dam


पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, मातीचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्ह्यात विविध जलसंधारण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम तसेच प्रत्यक्ष जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये जलसंधारणाचे महत्त्व रुजवून पाणी बचतीला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन–जलासाठी चालूया’ या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ हा या उपक्रमाचा मुख्य संदेश आहे. तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संकल्पनेतून नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जागृती करण्यात येणार आहे.

माती आणि पाण्याचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या पदयात्रेत पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. युवक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्यरत विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘पाणी वाचवा, भविष्यासाठी पाणी जपा’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे प्रशासनाने म्हटले आहे. पदयात्रेत सहभागी नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे. जलसंधारण हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता त्याला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप मिळावे, यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande