खड्ड्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या ‘व्हायरल गर्ल्स’नी राज ठाकरेंची घेतली भेट
अभ्यासावर लक्ष देण्याचा दिला सल्ला मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याच्या दुरवस्थेचं अवघ्या ४७ सेकंदांत भन्नाट पद्धतीने रिपोर्टिंग करून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शाळकरी मुलींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवत
Raj Thackeray Meets Viral Girls Reported Potholes


अभ्यासावर लक्ष देण्याचा दिला सल्ला

मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याच्या दुरवस्थेचं अवघ्या ४७ सेकंदांत भन्नाट पद्धतीने रिपोर्टिंग करून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या शाळकरी मुलींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. छत्रीचा माईक म्हणून वापर करत रस्त्यावरील खड्ड्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या या मुलींच्या व्हिडीओने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीमही सुरू झाली होती.

राज ठाकरे यांनी या मुलींना शिवतीर्थावर बोलावून त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या शिक्षणाची, कुटुंबाची, गावाची आणि शाळेची माहिती घेतली. मुली सध्या दहावीच्या वर्गात शिकत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राज ठाकरे यांनी मोठं झाल्यानंतर काय बनणार, तसेच पत्रकार होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न मुलींना विचारला. मात्र, त्यांनी पत्रकार होण्यास नकार दिला. एका मुलीने स्टेनो होण्याची इच्छा व्यक्त केली, तर दुसरीने युट्यूबर आणि तिसरीने स्केच आर्टिस्ट होण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं.

व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मुलींच्या अनेक मुलाखती होत आहेत. त्यामुळे दररोज तीन ते चार तास मुलाखती देण्यात जात असून अभ्यासावर परिणाम होत असल्याचं त्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं. यावर राज ठाकरे यांनी मुलींना आता मुलाखती देणं थांबवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला दिला. शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व असल्याचं सांगत भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आपल्याला कळवावं, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

दरम्यान, आमचा व्हिडीओ नेमका कसा व्हायरल झाला हे आम्हालाही माहिती नाही. आमच्या मित्राने तो व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवला होता. त्यानंतर कुणीतरी व्हिडीओ डाऊनलोड करून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला, असं मुलींनी सांगितलं. राज ठाकरेंनी व्हिडीओ पाहून दखल घेत आम्हाला भेटीसाठी बोलावलं आणि शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. राज साहेबांनी सन्मान केल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला, अशी भावना मुलींनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande