वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला रावेत पोलिसांकडून अटक
पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)। कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अर्हता नसतानाही रुग्णांना औषधे आणि इंजेक्शन्स देऊन बेकायदेशीर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला रावेत पोलिसांनी अटक केली. पुनावळे येथील पांढरे वस्ती परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आ
वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला रावेत पोलिसांकडून अटक


पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अर्हता नसतानाही रुग्णांना औषधे आणि इंजेक्शन्स देऊन बेकायदेशीर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला रावेत पोलिसांनी अटक केली. पुनावळे येथील पांढरे वस्ती परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

भागवत टेटकुराम निषाद (वय ३९, रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मोरे (वय ४७, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांनी या कारवाईची माहिती दिली.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला निषाद हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पुनावळे येथील पांढरे वस्ती परिसरात नागरिकांना औषधे देत असून रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मोरे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी केली.

पाहणीदरम्यान निषाद हा रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे आणि इंजेक्शन्स देत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, वैद्यकीय अर्हता नसतानाही तो बेकायदेशीररीत्या रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, निषाद घरोघरी जाऊनही रुग्णांवर उपचार करत होता. या प्रकरणी बीएनएस कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ मधील कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande