
वर्धा, 17 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात साथीजन्य रोगांचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या पंधरवड्यात ग्रामीण तसेच खासगी रुग्णालयात ताप, उलटी, जुलाब आणि अंगदुखीच्या रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. साचलेले पाणी, दमट हवामान आणि अस्वच्छतेमुळे डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉइड आणि व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव वाढला आहे. डास, दूषित पाणी आणि अन्न हेच या रोगांचे मुख्य कारण आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
घराजवळ पाणी साचू न देणे, टाक्या झाकून ठेवणे आणि आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतात आणि सखल भागात काम करणाऱ्यांना लेप्टोचा धोका जास्त आहे. त्यामुळे बूट आणि हातमोजे वापरणे गरजेचे आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये मुलांना उकळून थंड केलेले पाणीच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात ताप आल्यास तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अंगावर न काढता तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वयं औषधोपचार आणि पॅरासिटामॉल व्यतिरिक्त इतर गोळ्या घेणे टाळावे. डेंगीमध्ये प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पावसाचे पाणी पिणे आणि रस्त्यावरील उघड्यावरील अन्न खाणे टाळावे. नागरिकांनी घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. कचरा उघड्यावर टाकू नये. आठवड्यातून एकदा फ्रीज, कूलर आणि फुलदाणीतील पाणी बदलावे. शासनाच्या आरोग्य यंत्रणेसोबत नागरिकांनी सहकार्य केल्यास साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येऊ शकतो.
पावसाळ्यात सर्वात जास्त रुग्ण डेंग्यू आणि मलेरियाचे येत आहेत. डास चावल्यावर चार ते सात दिवसात ताप येतो. अंगदुखी, डोळ्यामागे दुखणे आणि अंगावर पुरळ ही डेंग्यूची लक्षणे आहेत. पाणी साचू देऊ नका आणि पूर्ण कपडे घाला. ताप आल्यास स्वतःहून अँटिबायोटिक घेऊ नका. भरपूर पाणी आणि नारळ पाणी प्या. वेळेवर रक्त तपासणी केल्यास धोका टळतो. घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका असे डॉ. अरुण पावडे, आर्वी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी