पुण्यात आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत महात्मा फुले व पीएम जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय-कर्करोग उपचारांची चर्चा
पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)। गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्य
MJPJY


पुणे, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत रुबी हॉलमध्ये हृदयविकार आणि कर्करोगावरील उपचार उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यातील अवयवदान चळवळीला गती देण्यासह आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अवयव प्रत्यारोपणाच्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी शासकीय योजनेत निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च झाल्यास, अतिरिक्त रक्कम कॉर्पस फंडातून उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

या निर्णयामुळे आर्थिक परिस्थितीमुळे रखडणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांना गती मिळण्याची शक्यता आहे. गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा अधिक सुलभ व्हाव्यात, यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि सीमावर्ती भागातील रुग्णांची सोय लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या केंद्रामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना सीटी स्कॅन, एक्स-रे, ईसीजी, टू-डी ईको आणि विविध रक्त तपासण्यांसाठी पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. या तपासणी सुविधा स्थानिक पातळीवर माफक दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना त्यांच्या परिसरातच आधुनिक निदान सुविधा मिळाल्यास वेळ आणि उपचाराचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गारगोटीतील प्रस्तावित केंद्राचा पश्चिम महाराष्ट्रासह सीमावर्ती भागातील रुग्णांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande