
यवतमाळ, 17 ऑगस्ट (हिं.स.)। शहराच्या पर्यावरणीय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकणारा रुद्राक्ष वनप्रकल्प निधीअभावी रखडला आहे. तब्बल १४ कोटी ९७ लाख रुपयांच्या या प्रकल्पासाठी सुरवातीला मिळालेल्या तीन कोटी रुपयांत प्राथमिक कामे झाली. मात्र, उर्वरित ११ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाचे पुढील काम ठप्प आहे. हा निधी तातडीने मंजूर करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी नगर परिषदेचे सदस्य रवी बेलुरकर यांनी केली आहे.
वणी शहरापासून सुमारे सहा ते सात किमी अंतरावर निंबाळा (रोड) परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५३ मध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे. वनविभागाच्या जागेवर साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाकडून वणीकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, निधीचा पुढील टप्पा न मिळाल्याने प्रकल्पाची गती मंदावली आहे. ही बाब लक्षात घेऊन रवी बेलुरकर यांनी माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे निधीची मागणी केली. या मागणीची दखल घेत मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवून रुद्राक्ष वनप्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
वणी परिसरात वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा प्रकल्पांची गरज अधिक आहे. त्यामुळे निधीअभावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडणे योग्य नाही. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर वनविभाग आता उर्वरित निधीबाबत काय निर्णय घेतो, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. रुद्राक्ष वनप्रकल्प पूर्ण झाल्यास वणीच्या पर्यावरणीय सौंदर्यात भर पडेल. नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर परिसर मिळेल. त्यामुळे उर्वरित ११ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून कामाला गती द्यावी, अशी मागणी रवी बेलुरकर यांनी केली आहे.
औषधी वनस्पतींचीही होणार लागवड
रुद्राक्ष वनप्रकल्पाचे स्वरूप केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून परिसराला पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. येथे रुद्राक्षाची झाडे, विविध औषधी वनस्पती, फुलझाडे आणि बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास वणीकरांसाठी निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी एक चांगले ठिकाण उपलब्ध होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी