
परभणी, 17 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचा आदर्श निर्माण करणारा विशेष उपक्रम जिंतूर येथे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 500 एकल महिलांना शिलाई मशीन, तर 100 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, निलेश त्रिभुवन, अश्विनी त्रिभुवन, प्रताप देशमुख, साखर कारखान्याच्या चेअरमन भावना बोर्डीकर मुंगसे, भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. पंडितराव दराडे, जिल्हा परिषद सदस्य रोहित चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य डॉ. देवराव कराळे, पंचायत समिती सभापती अयोध्याताई किशोर खिस्ते, उपसभापती सोनाली माधव दराडे, भाजप तालुकाध्यक्ष गोविंदराव थेटे यांच्यासह जिंतूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी, जिंतूर नगरपरिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांना केवळ मदत न करता त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या हाताला रोजगाराचे साधन आणि दिव्यांग बांधवांना गतिशीलतेचे साधन मिळाल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पालकमंत्र्यांनी येलदरी धरणाचे पाणी येत्या काही दिवसांत शेतकर्यांच्या थेट बांधापर्यंत आणण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकर्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या हाताला रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. शिलाई व्यवसायाच्या माध्यमातून या महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन निर्माण करता येणार असून, त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर 100 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक ट्रायसायकल देण्यात आल्याने त्यांच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार आहेत. शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक जीवनात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी या साधनांचा लाभ होणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांना मदत देताना अनावश्यक कागदपत्रांची पूर्तता, लांबलचक प्रशासकीय प्रक्रिया किंवा औपचारिक सर्वेक्षण यापेक्षा प्रत्यक्ष गरजूंच्या अडचणी समजून घेण्याला प्राधान्य देण्यात आले. गरज ओळखून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आल्याने या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंडितराव दराडे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis