
पुणे, १७ ऑगस्ट (हिं.स.) : स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक सिंहगडावर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, याच गर्दीत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हाणामारीदरम्यान दगडफेकही झाल्याची माहिती असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सिंहगडावर १५ ऑगस्ट रोजी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. गडावरील परिसरासह गडावरून खाली येणाऱ्या रस्त्यावरही वाहनांची आणि पर्यटकांची मोठी वर्दळ होती. त्यामुळे काही ठिकाणी पर्यटकांची अक्षरशः कोंडी झाली होती.
याच गर्दीत दोन गटांमध्ये सुरुवातीला वाद झाल्याचे सांगितले जात आहे. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.हाणामारी वाढत गेल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गर्दीचा मोठा ताण असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे इतर पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या झटापटीत काही तरुणांचे कपडे फाटल्याचेही दिसून येते. तसेच काही जण दगड आणि गोटे उचलून एकमेकांवर फेकताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असताना हा प्रकार घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेमुळे ऐतिहासिक पर्यटनस्थळांवरील वाढती गर्दी, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून अधिक प्रभावी बंदोबस्त आणि नियोजनाची गरज व्यक्त केली जात आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु