
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)
एक शिलाई मशीन आयुष्य बदलू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुशावाडी वॉटरशेड प्रकल्पातील लिंगन केरुर येथील लाभार्थी सौ. स्नेहा गजानन कदम.
लग्नाआधी शिवणकाम शिकले होते; पण मशीन नसल्याने ते कौशल्य हरवून गेले. संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी आणि आटलास कॉपको यांच्या सहाय्याने कुशावाडी वॉटरशेड प्रकल्पातून शिलाई मशीन मिळाल्यानंतर स्नेहाने पुन्हा प्रशिक्षण घेतले आणि घरातूनच शिवणकाम सुरू केले.
आज ती गावात “काकनावाणी झंपर शिवणारी स्नेहा” म्हणून ओळखली जाते. घर आणि शेतीची कामे सांभाळत ती दररोज सुमारे ₹500 आणि महिन्याला ₹15,000 पर्यंत उत्पन्न कमावते. विशेष म्हणजे, आता ग्राहक तिच्या वेळेनुसार काम करून घेतात.
स्नेहाचा हा प्रवास केवळ उत्पन्न वाढीचा नाही, तर आत्मविश्वास, कौशल्य आणि स्वाभिमानाच्या बळावर उभी राहिलेल्या एका ग्रामीण महिलेच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कहाणी आहे.
महिलांना कौशल्याच्या बळावर आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी आणि आटलास कॉपको यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या कुशावाडी वॉटरशेड प्रकल्पाचा हा सकारात्मक परिणाम आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis