
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : होटगी रस्त्यावरून वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार्यालयातील कचरा थेट उघड्यावर टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारातील कचरा रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आज सकाळी कार्यालयातील काही कर्मचारी रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता, ‘आमच्या कार्यालयाकडे महापालिकेची घंटागाडी येत नाही, मग कचरा कुठे टाकायचा?’ असे उत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शासकीय कार्यालयातूनच अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जीएसटी कार्यालयाच्या परिसरात महापालिकेची घंटागाडी नियमित येत नाही का, याची प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. घंटागाडी उपलब्ध नसल्यास कार्यालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘या परिसरात घंटागाडी येत नाही की कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच कचरा रस्त्यावर टाकला जात आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मीना मोकाटे यांनी केली आहे.
महापालिका प्रशासन आणि जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन कार्यालयासाठी नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अन्यथा काही दिवसांत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचून परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड