
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात नगरसेविकांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वसाधारण सभा आणि विविध प्रशासकीय बैठकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक-नगरसेविकांनी सहभागी होणे अपेक्षित असताना त्यांच्या पतींकडून बैठका आणि निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एका नगरसेविकेच्या पतीच्या उपस्थितीवरून स्वीकृत नगरसेविका तथा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आक्षेप घेतला.
संबंधित नगरसेविकेच्या पतीला बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनातील बैठका आणि निर्णयप्रक्रियेत अधिकृत लोकप्रतिनिधींची भूमिका यावरून चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेनंतर ‘महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवणार?’ असा सवाल उपस्थित झाला आहे. निवडून आलेल्या नगरसेविका आणि नगरसेवकांनाच बैठकीत सहभागी होऊन आपल्या प्रभागातील प्रश्न मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या पतींचा प्रशासकीय बैठकांमध्ये सहभाग कितपत योग्य, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजासाठी शासनाने विविध नियम आणि कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार महापालिकेचा कारभार अधिकृत लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणे अपेक्षित आहे.
नगरसेविका पतींचा हस्तक्षेप हा केवळ राजकीय चर्चेचा मुद्दा न राहता महापालिका प्रशासनातील अधिकार, कार्यपद्धती आणि नियमांच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्न बनला आहे.
महापालिकेच्या बैठकीत अनधिकृतरीत्या हस्तक्षेप करणाऱ्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार, शासनाने निश्चित केलेल्या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार का आणि नगरसेविका पतींच्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले जाणार का, हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचा सन्मान राखण्यासोबतच महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातील शिस्त कायम ठेवण्यासाठी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड