
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : शहर आणि जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासाच्या प्रश्नांवर सोलापूर विकास मंच आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २० ऑगस्ट रोजीच्या नियोजित सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंचाच्या वतीने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी भव्य निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर करण्यात येणार आहे. विमानसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक परिवहन, ५४ मीटर रस्ता, पूल, हद्दवाढ भागातील मूलभूत सुविधा, शिक्षण, उद्योग आणि आयटी पार्कसह विविध प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे.
सोलापूर विकास मंचाची बैठक जिल्हा परिषद आवारातील हॉटेल समृद्ध येथे झाली. या बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने ठोस आणि कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विकासकामांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सोलापूरकरांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी भूमिकाही मंचाने मांडली.
होटगी रोड येथील सोलापूर विमानतळावर सुरू असलेली विमानसेवा सातत्याने आणि सुरळीत राहण्यासाठी नाईट लँडिंगची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विकास मंचाने केली आहे.
विमानसेवेच्या भवितव्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सोलापूरकरांना पुरेशी व स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला.
विमानसेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय प्रक्रियांबाबत स्पष्टता निर्माण करण्याची मागणी मंचाने केली आहे.
सोलापूरच्या हवाई वाहतुकीला दीर्घकालीन स्थैर्य मिळावे, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका विकास मंचाने घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या आंदोलनातून शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आंदोलनादरम्यान नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळते का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड