थोरले बाजीराव पेशव्यांना उद्या भोंसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची मानवंदना
नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.)। : हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी आपल्या अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि युद्धकौशल्याने इतिहासात अजरामर ठरलेले थोरले बाजीराव पेशवा यांच्या जयंतीनिमित्त भोंसला मिलिटरी स्कूल( नाशिक) तर्फे उद्या (ता.१८ ऑगस्ट) त्यांच्या डुबेर
थोरले बाजीराव पेशव्यांना उद्या भोंसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची मानवंदना


नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

: हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी आपल्या अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि युद्धकौशल्याने इतिहासात अजरामर ठरलेले थोरले बाजीराव पेशवा यांच्या जयंतीनिमित्त भोंसला मिलिटरी स्कूल( नाशिक) तर्फे उद्या (ता.१८ ऑगस्ट) त्यांच्या डुबेरे( ता. सिन्नर, जि. नाशिक) या जन्मगावी जाऊन त्यांना मानवंदना देणार आहेत. थोरले बाजीराव पेशवा यांचा जन्म डुबेरे येथे झाला. अत्यंत कमी वयात पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या असामान्य नेतृत्वगुणांनी, धाडसी निर्णयक्षमतेने आणि प्रभावी युद्धनीतीने मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांच्या जीवनातील शौर्य, राष्ट्रनिष्ठा, नेतृत्व, गतिमान युद्धनीती आणि अडचणींवर मात करण्याची वृत्ती आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे.भोंसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना भारतीय इतिहासातील शूरवीरांच्या जीवनातून देशभक्ती, शिस्त, नेतृत्व, साहस आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून थोरले बाजीराव पेशव्यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या जीवनकार्याचा आणि पराक्रमाचा अभ्यासही करण्यात येणार आहे. भोंसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सैनिकी संस्कार रुजविण्याचे जे कार्य केले, त्याच राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना पुढे नेत विद्यार्थ्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाशी जोडण्याचा हा उपक्रम असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande