‘ॐ नमः शिवाय’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने शिवालये दुमदुमली; पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग
अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.) सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाला सुरुवात झाली असून, हिरवाईने नटलेली सृष्टी आणि महादेवाच्या भक्तीमय वातावरणामुळे अमरावती शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि याच दिवशी
‘ॐ नमः शिवाय’, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने शिवालये दुमदुमली; पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग


अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)

सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाला सुरुवात झाली असून, हिरवाईने नटलेली सृष्टी आणि महादेवाच्या भक्तीमय वातावरणामुळे अमरावती शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि याच दिवशी आलेली नागपंचमी यामुळे शहरातील प्रमुख शिवालयांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‘ॐ नमः शिवाय’, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.अमरावती शहरातील गडगडेश्वर, तपोवनेश्वर, कोंडेश्वर, पाताळेश्वर, भुतेश्वर तसेच अंबागेट परिसरातील विविध शिवालयांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. पहाटेच्या सुमारासच भाविक मंदिरांच्या दिशेने जाताना दिसत होते. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसह मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रांगेत उभे राहून भगवान महादेवाचे दर्शन घेतले.श्रावण सोमवारच्या निमित्ताने भाविकांनी भगवान शंकराला बेलपत्र, फुले आणि जल अर्पण केले. अनेक भाविकांकडून शिवलिंगावर दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक करण्यात आला. नागपंचमी असल्याने नागदेवतेचे पूजन करून भाविकांनी सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्याने यंदाच्या पर्वाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता शहरातील मंदिर संस्थानांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, प्रवेश आणि निर्गमनाची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीच्या ठिकाणी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि दर्शनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी स्वयंसेवक व मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घेतली.शिवालयांमध्ये सकाळपासूनच सुरू असलेले मंत्रोच्चार, घंटानाद, भजन आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. अनेक भाविकांनी उपवास करून पहाटेच शिवदर्शन घेतले. श्रावणातील पुढील सोमवारांनाही मोठ्या संख्येने भाविक मंदिरांमध्ये येण्याची शक्यता असल्याने मंदिर संस्थानांकडून गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक तयारी केली जात आहे.पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या दुहेरी पर्वामुळे अमरावतीतील शिवालयांमध्ये दिवसभर भक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक वातावरणाने शहरातील वातावरण अक्षरशः ‘हर हर महादेव’मय झाले होते.

पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. घरोघरी नागपंचमी साजरी केली जाणार असून, पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande