
अमरावती, 17 ऑगस्ट (हिं.स.)श्रावण मासाच्या पावन पर्वावर तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे संत मारुती महाराज शिवभक्त मंडळाच्या वतीने शंभूसेना कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कावड यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले. ‘हर हर महादेव’, ‘बोल बम’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
संत मारुती महाराज मंदिरापासून कावड यात्रेला सुरुवात झाली. कावडधारी शिवभक्तांनी पारंपरिक पोशाखात गावातून भव्य मिरवणूक काढली. खांद्यावर कावड घेऊन युवकांनी केलेल्या जयघोषामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. डीजेवरील भक्तिगीते, ढोल-ताशांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी यात्रेची रंगत वाढली.गावातून मिरवणूक काढल्यानंतर कावडधारी शिवभक्त रात्री नागेश्वर मंदिर, धामंत्री येथे पोहोचले. तेथे मुक्काम केल्यानंतर पहाटे ३ वाजता विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर धामंत्री येथील पावण नदीतून ६१ कलशांमध्ये पवित्र जल भरण्यात आले. हे जल घेऊन शिवभक्तांनी तब्बल ३२ किलोमीटरची पायदळ कावड यात्रा सुरू केली.या यात्रेत सुमारे ७०० फूट लांबीची भव्य कावड खांद्यावर घेऊन शिवभक्तांचा ताफा तळेगाव ठाकूरकडे रवाना झाला. या आगळ्यावेगळ्या कावड यात्रेमुळे सहभागी शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला होता. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’ आणि ‘बोल बम’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी कावड यात्रा तळेगाव ठाकूर येथे परतल्यानंतर गावकऱ्यांनी शिवभक्तांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर कावडधारी शिवभक्त कावड घेऊन गावातील विविध मंदिरांत तसेच संत मारुती महाराज मंदिरात पोहोचले. मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून धामंत्री येथील पावण नदीतून आणलेल्या पवित्र जलाने शिवपिंडीवर अभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.या कावड यात्रेत संत मारुती महाराज मंडळ, शंभूसेना मित्रमंडळाचे युवक तसेच अकोला येथील अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला विशेष रंगत आली. गावकऱ्यांनीही कावड यात्रेला मोठा प्रतिसाद देत ठिकठिकाणी शिवभक्तांचे स्वागत केले.
यावेळी शंभूसेना शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष ललित मारबदे, उपाध्यक्ष पूर्वेश मेहरे तसेच हर्षल आहाके, आदित्य मेहरे, पंकज मरस्कोल्हे, रोशन धुर्वे, जय टाकतोडे, रोहन मालगाये, कृणाल उके, अभिषेक पोटफोडे, हेमंत काळसर्पे यांच्यासह अकोला येथील शिवभक्त आणि तळेगाव ठाकूरमधील तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. श्रावण मासातील या कावड यात्रेच्या माध्यमातून युवकांनी धार्मिक परंपरा आणि शिवभक्तीची परंपरा जपण्याचा संदेश दिला. भक्ती, एकजूट आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या शंभूसेना कावड यात्रेची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी