शिक्षक बँकेच्या आमसभेत खडाजंगी; मृत सभासद कल्याण निधी ३० लाखांवर
महसूल कर्मचाऱ्यांना सभासदत्व देण्याच्या प्रस्तावाला विरोध सभासदांच्या आक्षेपानंतर निर्णयाचा मार्ग धुसर अमरावती, १७ ऑगस्ट (हिं.स.)। मृत सभासद कल्याण निधीच्या रकमेत वाढ करण्यासह महसूल कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे सभासदत्व देण्याच
शिक्षक बॅंकेची आमसभा विविध मुद्द्यांवर गाजली


महसूल कर्मचाऱ्यांना सभासदत्व देण्याच्या प्रस्तावाला विरोध सभासदांच्या आक्षेपानंतर निर्णयाचा मार्ग धुसर

अमरावती, १७ ऑगस्ट (हिं.स.)। मृत सभासद कल्याण निधीच्या रकमेत वाढ करण्यासह महसूल कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे सभासदत्व देण्याच्या मुद्द्यावरून बँकेच्या आमसभेत चांगलीच गरमागरम चर्चा झाली. काही सभासद आणि सत्ताधारी संचालक मंडळामध्ये या मुद्द्यांवरून खडाजंगीही झाली. दरम्यान, मृत सभासदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारा कल्याण निधी २० लाखांवरून ३० लाख रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आमसभेत मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची आमसभा अध्यक्ष गोकुलदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बँकेकडून मृत सभासदांच्या कुटुंबीयांना सध्या प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी सभासदांनी केली. मात्र, वाढीव मदत देण्यासाठी सभासदांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रीमियममध्ये वाढ करावी लागेल, असे अध्यक्ष राऊत यांनी स्पष्ट केले.

या विषयावर पंकज गुल्हाने, प्रभाकर झोड, सुनील कुकडे, सुनील केने आदी सभासदांनी आपली मते मांडली. सभासदांचे प्रीमियम वाढवून त्यांना अधिक आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर अध्यक्षांनी मृत सभासद कल्याण निधीमध्ये वाढ करून तो ३० लाख रुपये करण्यात येत असल्याचे सभागृहात जाहीर केले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या सभासदत्वावरून विरोध

दरम्यान, अमरावती विभागातील बदली न होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना शिक्षक बँकेचे सभासदत्व देण्याचा प्रस्ताव अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी मांडला. बँकेच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, या प्रस्तावाला काही सभासदांनी तीव्र आक्षेप घेतला.

पंकज गुल्हाने, सुनील कुकडे यांच्यासह काही सभासदांनी महसूल कर्मचाऱ्यांना सभासदत्व देण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे या प्रस्तावावरून सभागृहात चांगलीच चर्चा रंगली. सभासदांच्या विरोधामुळे महसूल कर्मचाऱ्यांना बँकेचे सभासदत्व मिळण्याचा मार्ग सध्या तरी धुसर झाला आहे.

“सभासदांना नको असेल तर आग्रह नाही”

याबाबत अध्यक्ष गोकुलदास राऊत म्हणाले, “नाशिक, वर्धा तसेच अन्य काही जिल्ह्यांमधील शिक्षक सहकारी बँकांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांना सभासदत्व देण्यात आले आहे. त्यामुळे त्या बँकांना फायदाच झाला आहे. तोच प्रयोग अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत करण्याचे संचालक मंडळाचे नियोजन होते. मात्र, सभासदांना ते नको असेल तर आमचा आग्रह नाही.”

आमसभेला उपाध्यक्ष सुरेंद्र मेटे यांच्यासह संचालक तुळशीदास धांडे, प्रफुल्ल शेंडे, मो. नाजीम अ. गफ्फार, कैलास कडू, उमेश चुनकीकर, अजयानंद पवार, रामदास कडू, रा. ना. गावंडे, मनीष काळे, विजय कोठाळे, संभाजी रेवाळे, राजेश गाडे, सरिता काठोळे, संगीता तडस, अॅड. राजपाल वानखडे, अॅड. मो. शकील अहमद मो. गयास तसेच सरव्यवस्थापक संजय साळवे आदी उपस्थित होते.------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande