अहमदपूरमध्ये ‘न समजलेले आई-बाप समजून घेताना’ व्याख्यान; विद्यार्थी-पालकांना भावनिक संदेश
लातूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : प्रत्येक मुला-मुलीच्या तसेच आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणारे आणि कुटुंबातील नात्यांना नवी वीण देणारे एक हृदयस्पर्शी व्याख्यान अहमदपूर शहरात आयोजित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आणि उपविभाग
पोलीस विद्यार्थी संवाद


लातूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : प्रत्येक मुला-मुलीच्या तसेच आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणारे आणि कुटुंबातील नात्यांना नवी वीण देणारे एक हृदयस्पर्शी व्याख्यान अहमदपूर शहरात आयोजित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोलीस-विद्यार्थी संवाद कार्यक्रम’ अंतर्गत या विशेष प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, मूल्यशिक्षण आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासोबतच कुटुंबातील जिव्हाळा आणि संवाद वाढविण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे ‘न समजलेले आई-बाप समजून घेताना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी घेतलेले कष्ट, त्यांचे मूक बलिदान आणि अनेकदा मुलांच्या नजरेतून सुटणारे त्यांचे प्रेम यावर या व्याख्यानातून प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही हे व्याख्यान भावनिक आणि विचारप्रवर्तक ठरण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते होणार आहे. काव्य जागर प्रतिष्ठान, अहमदपूर आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघ, अहमदपूर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिव-पार्वती मंगल कार्यालय, निजवंते नगर, अहमदपूर येथे होणार आहे.

अहमदपूर शहरातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी या प्रबोधनपर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासन आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande