गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत बोगदा खोदकामास प्रारंभ
* भव्य ''टनेल बोअरिंग मशिन''चे ''तुळशी'' असे नामकरण मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) हा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा
टनेल बोअरिंग मशिन तुळशी


टनेल बोअरिंग मशिन तुळशी


* भव्य 'टनेल बोअरिंग मशिन'चे 'तुळशी' असे नामकरण

मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.) - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) हा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिले बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित करुन गोरेगाव - मुलुंड जोड रस्‍ता प्रकल्‍पांतर्गत बोगदा खोदकामास सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारंभ करण्‍यात आला आहे. बोगदे खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भव्य 'टनेल बोअरिंग मशिन'चे 'तुळशी' असे नामकरण करण्यात आले आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (टप्‍पा ३ ब)

गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता (GMLR) हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा १२.२० किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाद्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. या बोगद्यांच्या बांधकामादरम्यान पर्यावरण आणि जैवविविधतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये १७ क्रॉस पॅसेज, ७२० मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे (Twin Box Tunnel), गोरेगाव व मुलुंड येथे ६०० मीटर लांबीचे पोहोच रस्ते (Approach Roads) यांचा समावेश असून, प्रकल्पाची एकूण लांबी ६.६२ किलोमीटर आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे संचलन व देखभाल (O&M) करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.

प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून टप्पा - १ व टप्पा - २ अंतर्गत आवश्यक पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक वृक्षतोड परवानगी मिळाली आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ९०६ प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे तळमजला + २३ मजली अशा सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे.

प्रकल्पात EPB (Earth Pressure Balance) टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे बोगदा खोदकाम, NATM (New Austrian Tunnelling Method) तंत्रज्ञानाद्वारे क्रॉस पॅसेजचे बांधकाम, यांत्रिक वायुवीजन व्यवस्था (Mechanical Ventilation), मिस्ट आधारित अग्निशमन प्रणाली (Mist-Based Firefighting System), CCTV, SCADA नियंत्रण प्रणाली, LED प्रकाशयोजना तसेच आधुनिक दिशादर्शक फलक (Signages) यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय, दुहेरी बोगद्यांमध्ये रस्त्याखाली उपयोगिता वाहिन्‍यांची (Utility Ducts) तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक बोगद्यातून १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या गुणवत्ता नियंत्रण व देखरेखीसाठी मेसर्स टिप्स्या इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC), भारतीय तंत्रज्ञान संस्‍था (IIT Mumbai) यांची फेरतपासणी सल्लागार (Proof Checking Consultant) तसेच व्हीजेटीआय, मुंबई यांची तृतीय पक्ष गुणवत्ता लेखापरीक्षक (Third Party Quality Auditor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत प्रकल्पाची सुमारे २१% भौतिक प्रगती झाली आहे. TBM - 1 ची जोडणी पूर्ण होऊन स्थळ स्वीकृती चाचणी (Site Acceptance Test) देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.

TBM - 2 ची जोडणी प्रगतिपथावर आहे. त्याद्वारे ऑक्टोबर २०२६ पासून खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होईल. त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होऊन प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून अवघ्या २० मिनिटांपर्यंत कमी होईल. परिणामी, प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. तसेच, पूर्व - पश्चिम उपनगरांमधील संपर्क क्षमता अधिक कार्यक्षम होईल. आपत्कालीन सेवांचा प्रतिसाद वेळ कमी होईल. व्यावसायिक व औद्योगिक वाहतुकीला गती मिळेल आणि मुंबईच्या विद्यमान रस्ते जाळ्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन महानगराच्‍या एकूण वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande