
रायगड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। पेण : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पेण तालुक्यातील जांबोशी येथे उभारण्यात आलेल्या अमृत सरोवराचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री जाधव यांच्या हस्ते अमृत सरोवरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी पाणलोट समितीचे सचिव व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या सदस्या, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय भावनेला जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला अभिवादन केल्यानंतर उपस्थितांनी जल, माती आणि पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. गावाच्या विकासासाठी जलसुरक्षा महत्त्वाची असून उपलब्ध जलसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थाची असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अमृत सरोवराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सरोवरामुळे पाणीसाठा वाढण्याबरोबरच भूजल पुनर्भरण, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होणार असल्याचे मृद व जलसंधारण अधिकारी कविजित पाटील यांनी सांगितले. अमृत सरोवर ही केवळ जलसाठवणूक संरचना नसून गावाची सामुदायिक जलसंपत्ती आहे. तिची देखभाल आणि शाश्वत वापर ग्रामस्थांनी लोकसहभागातून करावा, असे आवाहन करण्यात आले.
जांबोशी येथील अमृत सरोवराची लांबी १३१ मीटर, रुंदी ४८ मीटर आणि खोली ५.८० मीटर आहे. या सरोवरात २५.१५ टीसीएम म्हणजे सुमारे २ कोटी ५१ लाख ५० हजार लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या जलसाठ्यामुळे सुमारे १० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता विक्रम देशमुख, कनिष्ठ अभियंता अक्षय वि. भोसले, हर्षल पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
---------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)