
दापोलीतील कृषी महाविद्यालयाच्या ‘संजीवनी’ गटाचा उपक्रम
खत व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पुणे, १७ ऑगस्ट (हिं.स.) : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय, दापोली येथील विद्यार्थीनींच्या ‘संजीवनी’ गटाच्या वतीने शेतकरी दिनेश शिवणकर यांच्या भातशेतीमध्ये युरिया डीएपी ब्रिकेट्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले.
शेतकऱ्यांना नत्रयुक्त खतांचा कार्यक्षम वापर आणि योग्य खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे हा या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश होता. यावेळी युरिया डीएपी ब्रिकेट्सचे स्वरूप, वापरण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चार भात रोपांच्या मध्यभागी एक ब्रिकेट ७ ते १० सेंटीमीटर खोलीवर जमिनीत ठेवण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखविण्यात आली. तसेच एका गुंठ्यासाठी सुमारे ६२५ ब्रिकेट्स आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली.
युरिया डीएपी ब्रिकेट्सच्या वापरामुळे नत्राची कार्यक्षमता वाढण्यास, खताचा अपव्यय आणि नत्राची धूप कमी करण्यास तसेच भात पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर आणि कार्यक्षम खत व्यवस्थापनाची पद्धत समजून घेण्यास या प्रात्यक्षिकाचा फायदा झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ‘संजीवनी’ गटातील विद्यार्थीनी कृतिका ठाकरे, श्रावणी गिम्हवणेकर, कुंजल कांबळे, कृतिका खोडका, वैष्णवी अहिरे, अंजली देवकाते, सानिया खोत, स्वालिहा मुकादम, तेजोन्मयी बलवान आणि अक्षता कालप यांनी केले.
हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. डोसानी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु