
गडचिरोली., 17 ऑगस्ट (हिं.स.) स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन मध्येच थांबविल्याचा आरोप करत, या अवमानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सोमवारी (१७ ऑगस्ट) शहरातील मध्यवर्ती इंदिरा गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “सोनिया गांधी मुर्दाबाद, वंदे मातरम् विजय असो” अशा घोषणांनी इंदिरा गांधी चौक परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.
राष्ट्रीय गीताचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी: डॉ. अशोक नेते
निषेध आंदोलनात सहभागी झालेले माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. “वंदे मातरम् हे केवळ गीत नसून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची आणि राष्ट्रभावनेची अमर प्रेरणा आहे. राष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेल्या या गीताचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा राष्ट्रीय गीताचा अवमान देश कधीही सहन करणार नाही,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
या आंदोलनाला भाजपचे ज्येष्ठ नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागाडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर यांचा समावेश होता.
तसेच रोशनी वरघंटे, अनिल पोहनकर, आनंद भांडेकर, गोवर्धन चव्हाण, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, नरेश हजारे, साई सिलमवार यांच्यासह विविध आघाडींचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनाच्या शेवटी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय गीताचा सन्मान आणि राष्ट्रभावनेचा आदर कायम अबाधित राखण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond