
अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)।शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने १७ ऑगस्टपासून शहरातील जड व काही हलक्या मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत संबंधित वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही.
ज्या व्यावसायिक हलक्या मालवाहू वाहनांचे वजन किंवा भारसंहित वजन दोन टनांपेक्षा अधिक आहे, तसेच अतिअवजड आणि मल्टिअॅक्सल वाहनांचा या प्रवेशबंदीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी काही वाहनांना पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, कचरा संकलन, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.अन्नधान्य व कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत शहरात प्रवेशाची परवानगी राहणार आहे. त्यामुळे शेतमालाची आवक-जावक आणि बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
गौण खनिज वाहतुकीस वेळेची सवलत
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे. रविवारी मात्र सकाळी ६.३० ते ११ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत गौण खनिज वाहतुकीला परवानगी राहणार आहे. रेडी मिक्सर वाहनांनाही दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि रविवारी निश्चित केलेल्या वेळेत वाहतुकीची सवलत देण्यात आली आहे. वाहतूक कोंडी कमी करून अपघातांचे प्रमाण घटविणे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी