
पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, नागरिकांना दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून देणे आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथ मित्र) पुरस्कार’ देण्यात येतात. सन २०२५-२६ या वर्षासाठी इच्छुक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवकांनी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. या ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथपेटी देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय राज्यातील एका राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्याला आणि एका राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवकाला प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथपेटी देण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथपेटी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते आणि सेवकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु