दुष्काळी धाराशिवने रुजवली हरित आशा; १२ तासांत १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळाची सातत्याने झळ आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प वनक्षेत्र अशी पर्यावरणीय आव्हाने असलेल्या धाराशिव जिल्ह्याने शुक्रवारी हिरवाईच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले. जिल्ह्यातील
दुष्काळी धाराशिवने रुजवली हरित आशा; १२ तासांत १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळाची सातत्याने झळ आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प वनक्षेत्र अशी पर्यावरणीय आव्हाने असलेल्या धाराशिव जिल्ह्याने शुक्रवारी हिरवाईच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले. जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकाच वेळी १२ तासांत १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड करून ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाला लोकसहभागाची भक्कम साथ मिळाल्याने हा उपक्रम केवळ विक्रम न राहता दुष्काळी भूमीवर हिरवाई, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाची नवी आशा रुजविणारी लोकचळवळ ठरला.

दुष्काळी जिल्ह्याची हिरवाईकडे वाटचाल

धाराशिवची ओळख प्रामुख्याने दुष्काळी जिल्हा म्हणून आहे.कमी पर्जन्यमानामुळे शेती,पाणी आणि पर्यावरणासमोरील आव्हाने कायम आहेत.त्यातच जिल्ह्यातील वनक्षेत्र अत्यल्प असल्याने हरित आच्छादन वाढविणे ही काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी सुरू झालेल्या ‘हरित धाराशिव’ अभियानाला यंदा ‘हरित धाराशिव २.०’च्या माध्यमातून अधिक व्यापक रूप देण्यात आले.मागील वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेला लोकविश्वास,प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन आणि विविध विभागांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा विक्रम साकारला.

मागील वर्षी १९ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती.लावलेल्या रोपांपैकी सुमारे १३ लाख रोपे जिवंत असल्याने यंदाच्या मोहिमेला संवर्धनाचा अनुभव आणि विश्वासाची भक्कम पार्श्वभूमी मिळाली.त्यामुळे यंदा केवळ लागवडीच्या संख्येवर भर न देता रोपांची नोंद,पडताळणी,स्थानिक प्रजातींची निवड आणि पुढील संगोपन यांनाही प्राधान्य देण्यात आले.

आठ ठिकाणी एकाच वेळी हिरवाईचा उत्सव

‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकूण ३३.७ हेक्टर क्षेत्रावर १० लाख ७ हजार ९७५ रोपांची लागवड करण्यात आली.सामाजिक वनीकरण विभागाच्या चार ठिकाणी १४.५ हेक्टर क्षेत्रावर चार लाख ३५ हजार,वन विभागाच्या तीन ठिकाणी १४.२ हेक्टर क्षेत्रावर चार लाख २६ हजार,तर वन्यजीव विभागाच्या येडशी अभयारण्यातील एका ठिकाणी एक लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande