छत्रपती संभाजीनगर - सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे वाटप
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे,त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्प
छत्रपती संभाजीनगर - सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे वाटप


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे,त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा,या उद्देशाने राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन २००४-०५ पासून राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना ४ एकर कोरडवाहू (जिरायती) अथवा २ एकर ओलीताखालील (बागायती) जमीन शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते.

या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील गट क्रमांक ५३९ मधील जिरायती क्षेत्र ५.३८ हेक्टर (१३ एकर १८ आर) जमीन समाज कल्याण विभागाने खरेदी केली असून ती तीन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.

यामध्ये चोराखळी (ता. कळंब) येथील खुणे ज्योती संतोष (विधवा) यांना गट क्रमांक ५३९ मधील १ हेक्टर ७१ आर जिरायती जमीन वाटप करण्यात येणार आहे.तसेच वंजारे रमाबाई राजकुमार (विधवा) यांनाही याच गटातील १ हेक्टर ७१ आर क्षेत्र देण्यात येणार आहे.याशिवाय खंडागळे विलास अच्युत व लक्ष्मी विलास खंडागळे,रा.चोराखळी, ता.कळंब,जि.धाराशिव यांना १ हेक्टर ८० आर जिरायती जमीन वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे भूमिहीन कुटुंबांना शेतीच्या माध्यमातून स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक व सामाजिक सबळीकरणाला चालना मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande